IND vs PAK T20 World Cup 2022: T20 वर्ल्ड कप च्या सुपर १२ मधील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने मात केली. कोहलीच्या दमदार फलंदाजीमुळे पाकिस्तानच्या खिशात गेलेला सामना भारताने जिंकला.
पावसाची कृपा आणि कोहलीचा कहर
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारताला 160 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. या रोमहर्षक सामन्यात भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना 31 धावांत चार विकेट गमावल्या होत्या, पण कोहली-पांड्या जोडीने 113 धावांची भागीदारी रचून संघाला मजबूत स्थितीत आणले.
भारताला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. या षटकात पंड्या आणि दिनेश कार्तिकही बाद झाले, मात्र षटकाच्या चौथ्या चेंडूवर कोहलीच्या षटकारामुळे भारताने सहा गडी गमावून 160 धावांचे लक्ष्य गाठले. कोहलीने 53 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 82 धावा केल्या, तर पांड्याने त्याला साथ देत 37 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या.
हे ही वाचा: विराट कोहलीच्या खेळीचे पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक
अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांची सर्वोत्तम गोलंदाजी
काही दिवस असलेल्या पावसाळी वातावणामुळे मैदानावर हिरवे गवत आणि ओलावा होता. नाणीफेक जिंकून रोहितने गोलंदाजी चा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी तो सार्थ ठरवला. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे MCG खेळपट्टी झाकली गेली होती आणि ती अजूनही ओलसर होती. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची खूप मदत मिळत झाली. याचा पुरेपूर फायदा भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीपने घेतला. दोघांनी ताशी 130 किमी वेगाने गोलंदाजी केली.
पहिल्याच षटकात भुवनेश्वरने पाकिस्तानी फलंदाजांना हात उघडू दिला नाही. दुसरीकडे अर्शदीपने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबरला पायचीत बाद केले. रिझवानही अर्शदीपच्या शॉर्ट बॉलवर चार धावा करत त्याचा बळी ठरला, त्याचा झेल भुवनेश्वरने फाइन लेग बाऊंड्रीजवळ पकडला. पहिल्या दोन षटकांतच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (0) आणि मोहम्मद रिझवान (4) यांना बाद करून अर्शदीपने भारताला चांगली सुरुवात करून दिली. अर्शदीपने चार षटकांत ३२ धावा देत तीन बळी घेतले.
आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्यानेही 30 धावांत तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने पाकिस्तानला आठ बाद १५९ धावांवर रोखले. फिरकीपटू आर अश्विन आणि अक्षर पटेल संघर्ष करताना दिसले, त्यामुळे सहावा गोलंदाज पांड्याने चार षटके टाकली.
पाकिस्तानची फलंदाजी
पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने ५१ धावा केल्या. शान मसूदने 42 चेंडूत 52 धावा केल्या मात्र तो चाचफडत होता. फखर जमान प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे मसूदला वरच्या फळीत बढती देण्यात आली होती. त्याने इफ्तिखारला आक्रमक खेळ दाखवू दिला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीकडे चेंडू सोपवला तर नवव्या षटकात फिरकीपटू अश्विन गोलंदाजीसाठी आला.
इफ्तिखारने पाच चेंडूत चार षटकार ठोकले पण शमीने दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला पायचीत करून तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी केलेली ७६ धावांची भागीदारी तोडली. हार्दिक पांड्याने शादाब खान, हैदर अली आणि मोहम्मद नवाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शाहीन शाह आफ्रिदीने काही सुरेख फटके खेळून पाकिस्तानला 150 च्या पुढे नेले.
भारताची वाईट सुरुवात
धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहुलच्या विकेट लवकर गमावल्या. यानंतर सूर्यकुमार आणि अक्षर पटेल यांनाही विशेष कामगिरी करता आली नाही, त्यामुळे भारताची धावसंख्या ४ विकेट्सवर ३१ धावा झाली. अशा बिकट परिस्थितीत विराटच्या साथीला हार्दिक पंड्या आणि त्यांनी भारताचा डाव सावरला. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यातील 113 धावांच्या शतकी भागीदारीमुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. पुढे शेवटच्या शतकात १६ धावांची गरज असताना पंड्या आणि कार्तिक बाद झाले पण विराट कोहलीने आश्विनच्या मदतीने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. कोहलीने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले.
कोहलीच्या दमदार फलंदाजीमुळे पाकिस्तानच्या खिशात गेलेला सामना भारताने जिंकला. आजच्या या विजयानंतर जगभरातून भारतीय संघाचे आणि विशेषतः विराट कोहलीचे कौतुक होत आहे.
शेवटच्या षटकामधील थरार
विराटने विजय मिळवून दिलेल्या या सामन्यामध्ये भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने पहिल्या चेंडूवर हार्दिकला (३७ चेंडूंत ४० धावा) बाद केले. हार्दिक आणि कोहलीने ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर मिळून तीन धावाच निघाल्या. मात्र, नवाजचा पुढील चेंडू ‘नो-बॉल’ ठरला. कमरेवरील हा चेंडू कोहलीने सीमारेषेबाहेर पोहोचवला. त्यानंतर नवाजने वाइड चेंडू टाकला. भारताला तीन चेंडूंत पाच धावांची गरज असताना नवाजने कोहलीच्या यष्टी उडवल्या. मात्र, चेंडू ‘फ्री-हिट’ असल्याने कोहली बाद झाला नाही, शिवाय चेंडू यष्टीला लागून मागच्या दिशेने गेल्याने भारताला तीन धावा करता आल्या. पुढील चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या अश्विनने थंड डोक्याने खेळत पहिलाच चेंडू वाईड आहे हे ओळखले आणि एक अतिरिक्त धाव खिशात घातली. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने भारताचा विजय सुनिश्चित केला.