HanuMan Teaser OUT: तेलुगु चित्रपट ‘हनुमान’चा टीझर अखेर रिलीज झाला आहे, तेजा सज्जाचा हा चित्रपट भगवान हनुमानाच्या सामर्थ्याची एक झलक दाखविण्याचा प्रयत्न करतो. प्रशांत वर्मा दिग्दर्शित ‘हनुमान’ हा चित्रपट त्याच्या सर्वात महत्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. दक्षिणेत प्रशांत त्याच्या विज्ञान-कथा, गुप्तहेर आणि झोम्बी एपोकॅलिप्स सारख्या लोकप्रिय शैलींमधील मध्यम-बजेट चित्रपटांसाठी ओळखला जातो. सुपरहिरोचे विश्व निर्माण करण्यासाठी हा चित्रपट भारतीय पौराणिक कथांमधून प्रेरणा घेताना दिसतो.
HanuMan Teaser OUT: पौराणिक जगाची झलक
टीझरमध्ये भगवान हनुमानाच्या शक्ती असलेल्या पौराणिक जगाची झलक दिसते. त्यासोबत ऐकू येणारी संस्कृत स्तोत्रे आपल्याला एका रत्नाविषयी सांगतात, ज्यामुळे हनुमानाच्या अमर्याद शक्तींमध्ये प्रवेश होतो. आणि मग आपण आजच्या जगात परत येतो, जिथे आपल्याला चित्रपटातील तुफान अॅक्शन सीक्वेन्सचे व्हिज्युअल पाहायला मिळतात. आपल्याला तेजा सज्जा हनुमानाचे पारंपारिक शस्त्र गदा घेऊन एका शक्तिशाली प्रतिद्वंद्वीशी लढताना देखील दिसतो.
HanuMan Teaser OUT: पॅन-वर्ल्ड फिल्म
प्रशांत यांनी याआधी ‘awe’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. ‘हनुमान’च्या टिझर बद्दल बोलताना दिग्दर्शक प्रशांतने त्याच्या या सुपरहिरो चित्रपटाला ‘पॅन-वर्ल्ड फिल्म’ म्हटले आहे. तो म्हणाला, “तुम्ही माझे आधीचे चित्रपट पाहिले तर तुम्हाला त्यातही काही पौराणिक संदर्भ सापडतील. आम्ही ‘हनुमान’ या पौराणिक पात्रावर पहिल्यांदाच पूर्ण चित्रपट करत आहोत. अनेकांमधला तो पहिला आहे. आम्ही अनेक पात्रांसह प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करत आहोत. आम्ही आधीच ‘अधीरा’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
प्रशांत पुढे म्हणाला, “मी स्त्रीकेंद्रित सुपरहिरो चित्रपटाचीही योजना करत आहे. हे सर्व चित्रपट आपल्या पौराणिक कथांपासून प्रेरित असतील पण ते आधुनिक काळातले असंतील. अशा चित्रपटांकडून खूप अपेक्षा असतील. लोक म्हणतात की, मी वास्तविक चित्रपटांपेक्षा चांगले टीझर आणि ट्रेलर बनवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. पण, पहिल्यांदाच, मला विश्वास आहे की मी माझ्या टीझर आणि ट्रेलरपेक्षा चांगला चित्रपट बनवला आहे,” प्रशांत म्हणाला.
HanuMan Teaser OUT: अनेक भाषांमध्ये होणार प्रदर्शित
दिग्दर्शकाने ‘हनुमान’बद्दल असेही सांगितले की,”हा फक्त तेलुगु चित्रपट नसून पण एक आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे आणि तो केवळ भारतातील नाही तर संपूर्ण जगाचा चित्रपट आहे. आता त्यांचा हा आगामी ‘हनुमान’ हा चित्रपट हिंदीसह तेलगू. तामिळ, मल्याळम, आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून बरेच प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.
HanuMan Teaser OUT: टीझरचे कौतुक
या टिझरवर चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनेही ट्विट करत या चित्रपटाच्या टीझरचे कौतुक केले आहे आणि त्यावर चाहत्यांनीही हृदय आणि प्रेम इमोजींचा वर्षाव केला आहे.
या चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, विनय राय, राज दीपक शेट्टी, वेनेला किशोर, गेटअप श्रीनू आणि सत्या यांच्याही भूमिका आहेत.
आदिपुरुषशी तुलना
टिझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी याची तुलना ‘आदिपुरुष’शी करायला सुरुवात केली आहे. कमी बजेट असून तसेच यात कोणताही मोठा सुपरस्टार नसूनही हा चित्रपट बॉलिवूडवर भारी पडू शकतो असं नेटकरी हा टिझर पाहून म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या व्हीएफएक्सची लोक अजूनही थट्टा करत आहेत. अशातच ‘हनुमान’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या टिझरमुळे ही तुलना पुन्हा होऊ लागली आहे.