fbpx

महाराष्ट्रासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

जवळपास दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. आज शेवटच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळाला.

नवीन आलेल्या सरकारने महाराष्ट्रात सारेच सण आणि उत्सव दणक्यात साजरे करण्याचे ठरवले आहे. या आधी दहीहंडी उत्सव आणि स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला गेला. राज्य भरात बाप्पाचं आगमनही अत्यंत उत्साही वातावरणात झालं. विसर्जन मिरवणुका अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुरु होत्या. अनेक ठिकाणी तुफान पाऊस कोसळत होता, पाणी साचल्याने ट्राफिक जॅम झाले तरीही बाप्पांच्या विसर्जनाचा उत्साह काही कमी झाला नाही.

विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली. सध्याची राजकीय परिस्थिती आणि कोरोना नंतर पहिल्यांदाच तयार झालेलं निर्बंधमुक्त वातावरण ह्या दोन्ही कारणामुळे या वर्षी राज्यभरात अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने उत्साही वातावरण होते. गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून राज्यभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह दांडगा होता. विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी झाले. एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते मतभेद विसरुन एकत्र येताना दिसले.

मुख्यमंत्र्यांची जनसंपर्क मोहीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दुसरी संपर्क मोहीम राबवली. पावसात भिजत, कार्यकर्त्यांची संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजित नऊ मंडळांऐवजी एकूण २५ मंडळांना भेटी दिल्या. शहरातील प्रमुख सार्वजनिक मंडळांचे सामाजिक आणि राजकीय महत्व लक्षात घेत संपर्क मोहीम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी फलदायी ठरणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरच्या गणरायाला निरोप दिला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शांततेत गणेश विसर्जन साजरा करा असे आवाहन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *