fbpx

Super Auspicious Dhanteras: धनत्रयोदशी / धनतेरस

आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस (Dhanteras) हा सण साजरा केला जातो. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

Why is Dhantrayodashi celebrated? आपल्याला आयुष्य म्हणजे जीवन जगत असताना संपत्तीपेक्षा आपले आरोग्य महत्त्वाचे असते. आपल्या भारतीय संस्कृतीत आरोग्याला धनसंपदा असे म्हटले जाते. जेव्हा देवांनी आणि असुरांनी समुद्र मंथन केले तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी ‘अमृतकुंभ’ बाहेर घेऊन आले. म्हणून या दिवशी लक्ष्मी मातेबरोबर धन्वंतरीचीही पुजा केली जाते. धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णू देवांचा अवतार असल्याचे मानले जाते. धन्वंतरी हे देवांचे वैद्य होते. त्यामुळे धन्वंतरी देवांच्या पूजेने, अर्चनाने आपल्याला सुद्धा आरोग्य लाभते. तसेच आपल्या आरोग्याला लाभ होतो. त्यामुळे आपण दरवर्षी धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी साजरी करतो.

धन्वंतरीचे पूजन

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

धनत्रयोदशी पूजा विधी

धनत्रयोदशी (Dhanatrayodashi) च्या दिवशी पूजा विधी अत्यंत अचूकपणे केली पाहिजे. सर्वप्रथम एका पाटावर पांढऱ्या रंगाचे कापड अंथरावे. आता त्या कापडावर तांदळाची रास मांडून त्यावर कळस ठेवावा. आता एक लहान मडके घेऊन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सात धान्य भरावी. या सात धान्यामध्ये काळे उडीद घेऊ नयेत. पुन्हा तांदळाच्या तीन राशी मांडाव्यात. एका राशीवर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी, दुसऱ्या राशीवर धन्वंतरी चा फोटो ठेवावा तिसऱ्या राशेवर कुबेर यंत्र ठेवावे. या सर्वांची फुले वाहून, हळद व कुंकू लावून पूजा करून घ्यावी. पूजा केल्यानंतर आरती करावी, देवाला नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी.

अशाप्रकारे धनत्रयोदशी 2022 म्हणजेच धनतेरस 2022 चा पूजा विधी पूर्ण करावा.

हे ही वाचा: वसू बारस – दिवाळीचा पहिला दिवस

धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे?

  • भगवान धनवंतरीची पूजा करावी.
  • घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करावी.
  • सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.
  • मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.
  • तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करावी.
  • कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावावा.

कुबेर पूजन

  • आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवावी. त्यानंतर बसण्याचे नवीन कापड अंथरावे.
  • संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करावी.
  • कुबेराचे ध्यान करताना मंत्र म्हणावा: ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये, धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥
  • चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करावी. नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करावी.

यम दीपदान

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.
गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करावी आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करावी.

‘मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।’

सर्व सार्वजनिक स्थळावर दिवे लावावेत. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवावा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.

यमराज पूजन

या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा.
घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार वाती लावाव्यात. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करावी.

धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू, दागिने, सोने व चांदी का खरेदी करतात?

धनतेरस (Dhanteras) च्या दिवशी वस्तू, दागिने, सोने व चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येते असे मानले जाते. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) दिवशी सोन्याच्या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टीचा प्रवेश होत नाही असे मानले जाते. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी नवीन वस्तू, दागिने, सोने व चांदी खरेदी करतात.

काय आहे आख्यायिका?

धनत्रयोदशी (Dhanteras) या सणामागे आख्यायिका ही आहे. असे म्हणतात की हेमा राजाच्या पुत्राच्या कुंडलीत सोळाव्या वर्षी आकलमृत्यू लिहिला होता. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजाने त्याचे लग्न लावून दिले. लग्नानंतर चवथ्या दिवशी राजपुत्र मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस होता. या रात्री राजपुत्राच्या पत्नीने त्यास झोपू दिले नाही. तिने त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवले. संपूर्ण महालात तिने असंख्य दिवे लावून रोषणाई केली आणि जागोजागी सोन्याचांदीच्या राशी रचून ठेवल्या.

जेव्हा यम राजकुमाराच्या कक्षात प्रवेश करण्यासाठी सर्परुपात आला तेव्हा तिथल्या रोषणाईने आणि सोन्या चांदीने त्याचे डोळे दिपून गेले. त्यामुळे त्याला राजपुत्राच्या कक्षेत प्रवेश करता आला नाही. तो सोन्याचांदीच्या पर्वतावर चढला आणि रात्रभर शांतपणे गाणी आणि कथा ऐकत बसला. सकाळी राजपुत्राचे प्राण न घेताच यम आपल्या जगात (यमलोकात) परतला. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचले. म्हणुनच आजच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर यमासाठी दिवा लावला जातो. दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला ठेवून त्याला मनःपूर्वक नमस्कार केला जातो. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. या विधीला यमदीपदान असे म्हणतात.

धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त Dhanteras Shubh Muhurt 2022:

धनतेरस हा सण तेरस म्हणजेच त्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी 22 शनिवारी द्वादशी तिथी सायंकाळी 6.02 पर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. त्रयोदशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.03 पर्यंत राहील. अशा स्थितीत काही लोक 22 तारखेला धनत्रयोदशी साजरी करतील तर काही लोक रविवारी 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करतील.

अनेक जाणकारांच्या मते धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला आहे आणि नरक चतुर्दशीही याच दिवशी राहील. परंतु उदयतिथीनुसार 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करणे योग्य आहे.

चला आता जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या पूजेची शुभ मुहूर्त:

  • 23 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त. (Dhanteras shubh muhurt 2022)
  • धनत्रयोदशीच्या पूजेसाठी सर्वोत्तम शुभ वेळ: संध्याकाळी 05:44 ते 06:06.
  • अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:59 ते दुपारी 12:46 पर्यंत. या मुहूर्तामध्ये पूजा आणि खरेदी दोन्ही करता येईल.
  • विजय मुहूर्त: दुपारी 02:18 ते 03:05 पर्यंत. या मुहूर्तावर तुम्ही खरेदीही करू शकता.
  • धनत्रयोदशी शुभ योग Dhanteras shubh yog 2022:
  • सर्वार्थ सिद्धी योग : दिवसभर राहील.
  • अमृत ​​सिद्धी योग: दुपारी 02:34 पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:35 पर्यंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *