Defamation Notices for Khoke Taunt: महाराष्ट्र राज्यात सत्तांतर होऊन आता ५ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या पाच महिन्यांमध्ये महाविकास आघाडीच्या खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर ५० खोके घेतल्याचा आरोप वारंवार करण्यात आला आहे. खोके सरकार म्हणणाऱ्या विरोधकांच्या विरोधात शिंदे गटाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. खोके सरकार म्हणणाऱ्यांना आता मानहानीची नोटीस (Defamation Notices for Khoke Taunt) पाठवली जाणार आहे. पन्नास खोके आरोपांमुळे लोकांमध्ये संभ्रम पसरत असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे शिंदे गट आता कायदेशीर लढाई (Legal Battle) लढणार आहे. शिंदे गटाच्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी ही माहिती दिली आहे.
विजय शिवतारे यांची पत्रकार परिषद
विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 50 खोक्यांवरुन आरोप केले होते. हे आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा असं आवाहन करत माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात अडीच हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकू असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.
हे ही वाचा: ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून अविनाश जाधव – जितेंद्र आव्हाड आमने सामने
Defamation Notices for Khoke Taunt: मानहानीचे खटले दाखल करणार
विजय शिवतारे म्हणाले, “काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असतील आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे ५० आमदारांच्यावतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीसा दिल्या जातील.”
Defamation Notices for Khoke Taunt: पुरावे द्या नाहीतर माफी मागा
५० खोके घेतल्याचा आरोप पुराव्यासहित सिद्ध करा असे आव्हानही यावेळी विजय शिवतारे यांनी केले. ते म्हणाले, “खोके आणि बोके अजित पवारही म्हणत आहेत, सुप्रिया सुळेही म्हणत आहेत आणि आदित्य ठाकरेही म्हणत आहेत, या तिघांनाही नोटीसा पाठवल्या जातील. एकतर तुम्ही दिशाभूल करणारी वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरं जा. तुम्ही जे ५० खोके घेतल्याचा आरोप करत आहात, त्याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करावेत. निश्चतपणे खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट होईल.” शिंदे गटाने विजय शिवतारे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.
पुरावे नसताना आरोप केले जात आहेत, त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी जी शिवराळ भाषा वापरली ती रिअॅक्शन होती, आता मानहानीच्या केसला सामोरे जा किंवा माफी मागा असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजपबरोबर हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. पण भाजपसोबत जाण्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय.