Dahi Handi Is a Game: दहीहंडीला आता साहसी खेळाचा दर्जा मिळाला आहे. दही हंडीला खेळाचा दर्जा मिळावा यासाठी गोविंदा पथकांच्या मंडळांचा राज्य सरकारकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश मिळालं आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Dahi Handi Is a Sport: पुढील वर्षापासून दहीहंडीच्या स्पर्धा
इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या स्पर्धांमुळे गोविंदांना एक नवीन मंच मिळेल आणि त्यांची आर्थिक आणि व्यवसायिक स्थितीही सुधारेल अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा: दहीहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल
Dahi Handi Is a Sport : आर्थिक सहाय्याची योजना
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.
दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे.
गोविंदांसाठी अर्थ साहाय्य आणि आरक्षण
राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या ५% आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. याशिवाय राज्य सरकारने दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णयही घेतला आहे. त्याअंतर्गत गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना ७.५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास आर्थिक सहाय्यासाठी त्या पात्र ठरणार नाहीत. गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून १८ वर्षाखालील सहभागी गोविंदा आर्थिक सहाय्यासाठी पात्र ठरणार नाहीत.
खेळाचा दर्जा मिळावा यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा
दही हंडीला खेळाचा दर्जा (Sport) मिळावा यासाठी गोविंदा पथकांच्या मंडळांचा राज्य सरकारकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा सुरु होता. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वैभवातुन दहीहंडी हा खेळ पुढे आला आणि लोकप्रिय झाला. आता क्रीडा प्रकारात दहीहंडीचा समावेश केल्याने गोविंदांना खेळाडू म्हणून मिळणाऱ्या सर्व सुविधा आणि अनुदाने उपलब्ध होतील. गोविंदा जगभर जाऊन आपले कौशल्य दाखवू शकतील आणि महाराष्ट्राचे नाव होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे .