गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ करणार ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

पान नलिन दिग्दर्शित गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ २०२३ च्या ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ऑस्कर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार मानला जातो. जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांचा या सोहळ्यात गौरव केला जातो. गेले काही दिवस ऑस्कर २०२३ मध्ये कोणत्या चित्रपटाला नामांकन मिळणार याच्या सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. या स्पर्धेत ‘आरआरआर’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटांपैकी एकाची निवड होणार अशा चर्चा होत्या पण फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ ची निवड करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. परंतु फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष निर्माते टीपी अग्रवाल ज्युरी रूममध्ये म्हणतात, पान नलिन दिग्दर्शित गुजराती चित्रपट “एकमताने” निवडला गेला आहे. RRR आणि The Kashmir Files सारख्या लोकप्रिय चित्रपटांसह त्याच्याशी कोणतीही स्पर्धा नाही.

‘छेल्लो शो’ चित्रपटाची कथा

छेल्लो शो’ चित्रपटाची कथा एका ९ वर्षाच्या मुलाभोवती फिरते जो भारतातील एका दुर्गम खेड्यात राहतो. त्याला चित्रपट पाहायला खूप आवडतात. एक लहान मुलगा प्रोजेक्शन बूथमधून चित्रपट पाहण्यात उन्हाळा कसा घालवतो हे चित्रपटात दाखवले गेले आहे. हा चित्रपट आशा आणि निरागसतेवर केंद्रित आहे. आज आपल्या देशातून संपत चाललेल्या ‘सिंगल-स्क्रीन सिनेमा’ आणि ’35 मिमी सेल्युलॉइड फिल्म्स’ च्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट आहे.

या चित्रपटाची कथा दिग्दर्शक निलीन यांच्या बालपणातल्या काही अनुभवांना काल्पनिक जोड देऊन तयार केली आहे. नलिनचा जन्म सौराष्ट्रातील अडताळा गावात झाला होता. या चित्रपटाचे चित्रीकरणही सौराष्ट्रातील खेडेगावात आणि रेल्वे स्टेशनवर झाले आहे. त्यांनी जुन्या हिंदी चित्रपटपटांची रिळे आणि प्रोजेक्टर चालवता येणारे तंत्रज्ञ खास या चित्रपटासाठी आणले. या चित्रपटात प्रामुख्याने बाल कलाकारच आहेत. त्यासाठी सौराष्ट्रातल्याच गावांमधून सहा मुले निवडली गेली आहेत. या चित्रपटात भावीन रबारी, विकास बाटा, ऋचा मीना, भावेश श्रीमाळी, दिपेन रावल आणि राहुल कोळी यांच्या भूमिका आहेत.

मार्च 2020 मध्ये म्हणजे भारतात कोविड-19 साथीमुळे लावण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या अगदी आधी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पोस्ट-प्रॉडक्शन महामारीच्या काळातच पूर्ण झाले. या चित्रपटाची निर्मिती धीर मोमायाच्या जुगाड मोशन पिक्चर, नलिनच्या मान्सून फिल्म्स आणि मार्क ड्युएलच्या स्ट्रेंजर ८८ यांनी व्हर्जिनी लॅकोम्बेच्या व्हर्जिनी फिल्म्स आणि एरिक ड्युपॉन्टच्या गुप्त फिल्म्ससह सह-निर्मिती केली आहे.

कोणते चित्रपट होते शर्यतीत?

टीपी अग्रवाल यांनी सांगितले की, छेलो शोची निवड चित्रपट उद्योगातील 17 ज्युरी मेम्बर्सने केली आहे. या गुजराती चित्रपटाने ऑस्करच्या शर्यातीत वर्षभरातील अनेक मोठ्या हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांशी स्पर्धा केली, ज्यात नुकताच प्रदर्शित झालेला रणबीर कपूर-आलिया भट्ट अभिनित ‘ब्रह्मास्त्र’, एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’, आर माधवन दिग्दर्शित ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’, नागराज मंजुळे यांचा अमिताभ बच्चन अभिनीत ‘झुंड’, राजकुमार रावचा ‘बधाई दो’ आणि आयुष्मान खुरानाचा ‘अनेक’ असे अनेक चित्रपट होते. या शिवाय, तमिळ थ्रिलर इराविन निझाल (नॉन-लिनियर सिंगल-शॉट फिल्म), महेश नारायणन यांचे मल्याळम नाटक अरीयप्पू आणि अनिक दत्ताचे बंगाली चरित्रात्मक नाटक अपराजितो हेही शर्यातीत होते.

“छेलो शो हा ज्युरीचा एकमताने निर्णय होता. 17 पैकी सर्वांनी आम्हाला हा चित्रपट हवा असल्याचे सांगितले. हा पूर्णपणे ज्युरीचा निर्णय होता. ते म्हणाले की हा एक भारतीय चित्रपट आहे जो (ऑस्करसाठी) गेला पाहिजे,” असे टीपी अग्रवाल म्हणाले.

हे ही वाचा: 32 वर्षांनंतर काश्मीरमध्ये मल्टिप्लेक्स सिनेमा सुरु

द काश्मीर फाइल्स आणि RRR

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी भारतातर्फे ज्या दोन चित्रपटांना प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती ते म्हणजे काश्मीर फाइल्स आणि RRR, ज्यांनी पश्चिमेला सर्वाधिक लोकप्रियता मिळवली. एसएस राजामौलींचा RRR नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून, आंतरराष्ट्रीय मीडिया, चित्रपट निर्माते आणि चाहत्यांनी चित्रपट निर्मात्याच्या अत्यंत कल्पक कथाकथनाची दखल घेत व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवला.

एसएस राजामौली यांनी खरं तर यूएसमध्ये अनेक स्क्रीनिंगला हजेरी लावली होती आणि ऑस्करमध्ये आरआरआरच्या संधी वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रेक्षकांना संबोधित केले होते. पण अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार ज्युरींनी ‘छेल्लो’ शो ची निवड एकमताने केली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘आरआरआर’ यापुढे कुठेच नव्हते. ज्युरींना हाच चित्रपट हवा होता. ते म्हणाले की दुसरा किंवा तिसरा चित्रपट नाही,” टीपी अग्रवाल पुढे म्हणाले.

निर्माते टीएस नागभरणा (अध्यक्ष), चित्रपट निर्माते संगीत सिवन, संगीतकार जतिन पंडित, कॉस्च्युम डिझायनर निखत मरियम नीरुषा, निर्माते अंजन बोस, ध्वनी रेकॉर्डिस्ट मंदार कमलापूरकर, संपादक प्रतीक गुप्ता आदींचा या ज्युरी मेम्बर्स मध्ये समावेश होता.

कुठे पहाता येईल हा चित्रपट?

छेल्लो शोचा रॉबर्ट डेनिरोच्या ट्रिबेका चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झाला. हा चित्रपट गुजरातमधील चित्रपटगृहांमध्ये आणि भारतभरातील निवडक स्क्रीनवर १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती रॉय कपूर फिल्म्स, जुगाड मोशन पिक्चर्स, मान्सून फिल्म्स, छेल्लो शो एलएलपी आणि मार्क ड्युएल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *