fbpx

Aai Kuthe Kai Karte @1000 : ‘आई कुठे काय करते’चे १००० भाग पूर्ण

Aai Kuthe Kai Karte | आई कुठे काय करते : स्टार प्रवाह वर प्रसारित होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेचे नुकतेच १००० भाग पूर्ण झाले. ७ डिसेंबर २०१९ रोजी या मालिकेचं पहिलं चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं. ही मालिका सुरु झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आणि गेली ३ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपी लिस्टमध्ये ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kai Karte) ने नेहमीच अव्व्ल स्थान राखलं आहे आणि आता १००० भाग होऊनही ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.

अरुंधतीच्या भूमिकेत मधुराणी प्रभुलकर

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kai Karte) ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित करण्यात येते. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही अरुंधतीची भूमिका साकारत आहे. अभिनेते मिलिंद गवळी हे अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. अप्पांच्या भूमिकेत किशोर महाबोले आहेत तर कांचनताईंच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर आहेत. इतर भूमिकांमध्येही अनेक नावाजलेले चेहरे दिसत आहेत. नुकतीच या मालिकेविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला आहे. त्यानिमित्ताने प्रेक्षकही आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

Aai Kuthe Kai Karte : कथानक काय आहे?

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kai Karte) मालिकेत आजवर अनेक वळणं आली आहेत. मालिकेचं कथानक थोडक्यात सांगायचं तर,अरुंधती ही मध्यमवर्गीय गृहिणी आहे जी तिच्या सासरी एकत्र कुटुंबात नवरा, तीन मुलं, सासू सासऱ्यांसोबत राहत असते. लग्नाच्या २५ वर्षानंतर अरुंधतीलाचा नवरा अनिरुद्ध संजना बरोबर अफेअर करतो आणि त्यांचं अफेअर अरुंधतीला कळते ज्यामुळे अरुंधतीच्या पायाखालची जमीन सरकते. पण अरुंधती यातून सावरते आणि अनिरुद्ध पासून घटस्फोट घेते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते.अनिरुद्ध आणि संजना यांचं लग्न होते आणि अरुंधतीच्या आयुष्यातही तिच्या कॉलेजच्या काळातला मित्र आशुतोष येतो. अरुंधती आणि आशुतोष यांच्यातल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. घरच्यांच्या विरोध असूनही त्याला डावलून अरुंधती – आशुतोष लग्न करतात. सध्या मालिकेत आशुतोषची बहीण वीणा हिची एंट्री झाली आहे. वीणा आणि अनिरुद्ध बिझनेस पार्टनर झाले आहेत. आता या मालिकेचा १००० वा भाग प्रदर्शित झाला आहे आणि पुढेही अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील यात शंका नाही.

Aai Kuthe Kai Karte : सेटवर जोरदार सेलिब्रेशन

या मालिकेला १००० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेच्या सेटवर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सगळे केक कापताना दिसत आहेत. एकमेकांना भरवताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

या मालिकेसंबंधी मिलिंद गवळी यांनी एक विस्तृत पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी असे म्हंटले आहे की ७ डिसेम्बर २०१९ ला जेव्हा ही मालिका सुरु झाली तेव्हा त्यांच्या मनात मनामध्ये असंख्य प्रश्न होते, पण त्यांना असंही वाटत होतं की ही मालिका लोकांना खूपच आवडेल. त्याचं मुख्य कारण म्हणजे या सिरीयलच्या नावामध्ये ‘आई’ या शब्दाचा उल्लेख आहे, आणि दुसरं कारण होतं राजनजी शाही.

डायरेक्टर्स कट प्रोडक्शन चे सर्वेसर्वा राजनजी, सगळे कलाकार, दिग्दर्शनाची टीम, सेटिंग, लेखन हे सगळंच उत्कृष्ट होतं ज्याला ‘स्टार प्रवाह’ चॅनलचाही सहभाग लाभला ज्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या मालिकेने लोकांच्या मनामध्ये घर केलं.

हे ही वाचा : ‘दलपती 68’मध्ये विजय दुहेरी भूमिकेत दिसणार? चित्रपटाबद्दल मोठे अपडेट

बंगाली मालिकेचं रूपांतरण

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kai Karte) या मालिकेचे सुरवातीचे काही भाग हे ‘श्रीमोई’ नावाच्या बंगाली मालिकेचे मराठी रूपांतरण होतं. त्यामध्ये दाखविलेले अनिरुद्ध देशमुख यांचे पात्र सुरवातीला अगदी भारदस्त व्यक्तीमत्व होतं, त्याचे काही episodesएपिसोड्स राजनजींनी मिलिंद गवळी यांना पाहायला सांगितले होते. ‘अमरीश पुरी सारखी त्याची पर्सनॅलिटी असलेल्या त्या पात्राचे त्या मालिकेतले काम पाहिल्यानंतर मी जरा घाबरलेच होते’ असं मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे.

गवळी यांनी पुढे असं ही म्हंटल आहे की, “या टीमने तेव्हा मला सांभाळून घेतलं आणि एक हजार एपिसोड नंतर सुद्धा मला सांभाळून घेत आहे. त्यांनी एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख माझ्याकडून करून घेतला या ‘आई कुठे काय करते’ च्या टीमने. DKP राजन जी, स्टार प्रवाह पासून आमच्या अगदी स्पोर्ट बॉय पर्यंत सगळ्यांचा मी ऋणी आहे सगळ्यांचा मी आभारी आहे.’

‘आज सेटवर छान हवन पूजा झाली, १००० एपिसोड चा केक आज आम्ही कापला.’ हे ही गवळींनी आवर्जून सांगितले आहे. एकूणच १००० भागांच्या पूर्तीबद्दल त्यांना वाटणारं समाधान त्यांनी या पोस्ट मधून व्यक्त केले आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या संपूर्ण टीमचे १००० भाग पूर्ण झाल्याबद्दल वंदे महाराष्ट्र तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *