पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात बहुप्रतिक्षित 5G नेटवर्क सेवेचे उद्घाटन करण्यात आले. एका अधिकृत निवेदनात या बाबत माहिती देण्यात आली. या निवेदनानुसार, १३ निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे आणि येत्या २ वर्षांमध्ये देशभर या सेवेचा विस्तार केला जाणार आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०२३ ते २०४० दरम्यान ३६. ४ ट्रिलियन (४५५ अब्ज डॉलरचा) फायदा होण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक तृतीयांश वाटा हा 5G चा असेल. उत्पादन क्षेत्रात , किरकोळ (१२ टक्के) आणि कृषी (११ टक्के) यांना 5G तंत्रज्ञानाचा फायदा होईल असे अंदाज आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात 5G सेवा सुरू झाली. 1 ते 4 ऑक्टोबर 2022 या कालावधीत प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 च्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच असणारी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) हे दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेले प्रदर्शन आहे. अगदी अल्प कालावधीत देशातील 5G दूरसंचार सेवांच्या 80 टक्के जोडणी पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मागील आठवड्यात सांगितले होते.
5G नेटवर्क 4G पेक्षा कितीतरी पटीने वेगवान गती प्रदान करणारी आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करणारी आहे आणि कोट्यवधी कनेक्टेड डिव्हाइसेसना रिअल टाइममध्ये डेटा सर्व्हिस देण्यात ती सक्षम आहे.
या १३ शहरांना प्रथम 5G वापरता येणार..
दूरसंचार विभागच्या माहितीनुसार, भारतात 5G लाँच केल्यानंतर, पहिल्या टप्प्यात ज्या १३ शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल, त्यात अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे.
नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक फायदे
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 5G नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक फायदे आणू शकते, ज्यामुळे भारतीय समाजासाठी एक परिवर्तनकारी शक्ती बनण्याची क्षमता आहे. देशाच्या वाढीतील पारंपारिक अडथळे दूर करण्यात, स्टार्टअप्स आणि व्यावसायिक उपक्रमांद्वारे नवकल्पनांना चालना देण्यासाठी तसेच डिजिटल इंडियाच्या दृष्टीला चालना देण्यात मदत होईल.”
भारतातल्या टेलिकॉम कंपनीज 5G सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत त्यामुळे भारत आगामी काळात उत्तम डेटा गती आणि व्यत्यय-मुक्त व्हिडिओज चा अनुभव घेऊ शकेल अशी आशा आहे. ५ जी सेवा आल्यानंतर लोकांना स्मार्ट अॅम्ब्युलन्सपासून क्लाऊड गेमिंगपर्यंत सर्व काही मिळेल. ग्राहकांना देखील त्यांच्या खरेदी दरम्यान पूर्णपणे नवीन अनुभव मिळू शकतात. अर्थात सध्या मिळत असलेल्या ४ जी सेवेची गुणवत्ता बघता टेलिकॉम कंपनीज ५ जी सेवा किती सक्षम तऱ्हेने राबवतात हेही पाहावे लागेल.